केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी सायंकाळी मुंबईत येत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच बरोबर ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांचा दौरा निवडणूक रणनीती आणि सरकारच्या राजकीय निर्णयांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. या तयारीचा आढावा आता भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार आहेत. यासाठी अमित शाह शनिवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकित अमित शहा मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे. यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा देखील अमित शहा या बैठकीत घेणार आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असणार नाही. मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.
