राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची मध्यंतरी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी सूचक विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे राजकीय प्रश्नावर स्पष्टपणे बोलत नाहीत. संदिग्ध उत्तरे देत आहेत. खासकरून लोकसभा निवडणूक लढवणार का? लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे हे संदिग्ध उत्तरे देत आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही? तसेच भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी संदिग्ध उत्तर दिले आहे. आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं? असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
यावेळी अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला की, अलिकडेच लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांसमोर कौतुक केलं. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? हा प्रश्न ऐकल्यावर अमोल कोल्हे आधी हसले आणि यावर स्पष्टपणे उत्तरही दिलं.
अमोल कोल्हे पत्रकारांना महणाले की, “तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही तिकडे जाणार आहात का असं मी तुम्हाला विचारलं तर चालेल का? मुळात असं असतं का?” त्यावर समोरून प्रश्न आला, “पंतप्रधान मोदींनीच तुमचं कौतुक केलंय ही ऑफर नाही का?” त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “पंतप्रधानांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही, कोण म्हणतंय ही ऑफर आहे? मुळात ऑफर तर यायला पाहिजे.”
अमोल कोल्हे म्हणाले, सध्या ऑफर एकच आहे, शिवपुत्र संभाजी हे नाटक पाहायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, राजकीय पदं या गोष्टी केवळ पाच वर्षांसाठी असतात. परंतु शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे लोकांच्या, लहान मुलांच्या काळजावर जे कोरलं जाणार आहे ते जास्त शास्वत आहे.
