जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला; भाषण सुरू असतानाच झाला स्फोट

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. वाकायामा शहरातील भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. मात्र, बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदा यांना सुखरूप बाजूला नेण्यात आले होते. ज्या ठिकाणी भाषण होणार होते तेथून किशिदा यांना घेऊन जात असतानाच मोठा आवाज झाला. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केलीय.

पंतप्रधान किशिदा या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या एका उमेदवारासाठी भाषण देणार होते. दरम्यान, भाषणाला सुरुवात होण्याच्या काही क्षण आधीच हा स्फोट झाला. जपानी वृत्तसेवा जीजीच्या वृत्तानुसार, 15 एप्रिल रोजी वाकायामा शहरातील मैदानी भाषणादरम्यान पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याजवळ पाईप सारखी वस्तू फेकण्यात आली होती. दरम्यान, या घटनेच्या वर्षभरापूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरही बैठकीदरम्यान गोळी झाडण्यात आली होती ज्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.

दरम्यान, इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तींच्या सुरक्षेत सातत्याने हलगर्जीपणा का होतो याबाबत वारंवार शंका निर्माण होत आहे. मात्र जपानमधील पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भारताच्या पंतप्रधानांसारखी नाही. जपानमध्ये खूप कडक कायदे आहेत. तिथे परदेशी लोक फार कमी आहेत. त्यामुळे सुरक्षेची इतकी गरज नाही. मात्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत आढावा घेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे ठरवले होते. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान किशिदा यांच्यावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.