आमदार कसा होतो तेच पाहतो म्हणणाऱ्या नेत्याकडून अजित पवारांचे तोंड भरून कौतुक

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहेत. तू आमदार कसा होतो असा इशारा देऊन पुरंदर मतदारसंघात पवारांनी शिवतारे यांना पराभूतही केले होते. आता मात्र याच शिवतारे यांनी अजित पवारांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार हे उथळ माणूस नाहीत. कोणीतरी सांगितले म्हणून गेले आणि परत आले, असे अजित पवार नाहीत. राष्ट्रवादीमध्ये जे काही चालले आहे, त्याबाबत अजित पवार अस्वस्थ होते, म्हणूनच ते भाजपसोबत गेले होते. अजित पवार आपल्या पक्षात येणार, हे कोणाला आवडणार नाही. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांनी पक्ष सोडायची मी वाट बघत आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. अजित पवारांनी या अस्वस्थेतूनच पहाटेची शपथ घेतली होती. हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे, असा टोला विजय शिवतारे यांनी लगावला आहे. अजित पवार अस्वस्थ असल्याने त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत यावे, असे खुले आमंत्रणही शिवतारे यांनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून शिवतारे यांनी अजित पवारांना शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात येण्याचे आमंत्रण दिले आहे.