अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती दाखविण्यावरून काँग्रेसमध्येच जुंपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती दाखविण्यावरून काँग्रेसमध्येच जुंपली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाच सुनावले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन करून सीबीआय चौकशीबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचेही ते बोलले.

काँग्रेस नेते अजय माकन यांनी यावरून खरगे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांना सहानुभूती दाखवू नका किंवा पाठिंबा देऊ नका, असे आवाहन पक्षाला केले आहे. माकन म्हणाले की, दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा स्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याने गोंधळ उडेल आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल.

माकन यांनी ट्विट केले की, केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारख्या लोकांना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर खटले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सहानुभूतीची किंवा समर्थनाची गरज नाही. मद्य धोरण घोटाळा, घीगेट यासारख्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे. खरे तर महाठग सुकेश चंद्रशेखरने राजकारणी आणि मध्यस्थांशी बोलण्यासाठी ’15 ग्रॅम तूप’ हा कोडवर्ड वापरला होता. याचा अर्थ 15 कोटी रुपये रोख होता. या कोडवर्डचा संदर्भ देत माकन यांनी केजरीवाल यांना तूप घोटाळेबाज म्हटले आहे.

केजरीवाल यांनी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा पंजाब, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसविरोधात वापरला आहे हे पक्षाच्या नेत्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे माखन यांनी म्हटले आहे.