एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर काल रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली. संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरू होते. या निवडणुकी नंतर तातडीने मत मोजणीला सुरुवात झाली.रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाल्यानंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल लागला. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे पारडे जड होत त्यांचा दणदणीत विजय झाला. मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले तर उर्वरीत दिन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले.
लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. कोरोनाकाळात तर हे प्रकरण आणखीनच गंभीर वळणावर पोहोचले होते. कोरोनाकाळात अचानक टाळेबंदी झाली आणि नाट्यगृहाचा पडदादेखील बंद करण्यात आला होता. तेव्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुढे सरसावली होती.
यंदा दामले vs कांबळी अशी लढाई होती. त्यात यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले. पण अखेर दामले यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर आपला झेंडा रोवला. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १३२८ इतके मतदान झाले. त्यापैकी माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे १२४५ आणि गिरगांव येथे ८३ मतदान झाले. तर मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) यांचे एकूण ७३० मतदान झाले.दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’चा ८/२ असा विजय झाला यामध्ये प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे भरघोस मतांनी विजयी झाले. तर उर्वरित दोन उमेदवार हे आपलं पॅनल मधून विजयी झाले असूनह यामध्ये स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या मोने विजयी झाल्या.
