माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांची ११ कोटी संपत्ती जप्त करत ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने मंगळवारी कार्ती चिदंबरम यांची ११.०४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या चार मालमत्तेपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.
एक खासगी कंपनी पंजाबमधील मानसा येथे 1980 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारत होती. त्याची जबाबदारी एका चिनी कंपनीला देण्यात आली होती. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होत असल्याचा आरोप होत होता. कामाला गती देण्यासाठी चिनी व्यावसायिकांना मानसा येथे आणण्यात आले. चेन्नई येथील एका व्यक्तीने आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यासाठी व्हिसाची व्यवस्था केली होती. यामध्ये नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकूण 263 प्रकल्प व्हिसा जारी करण्यात आले.
एवढेच नाही तर या खासगी कंपनीने गृह मंत्रालयाला पत्र लिहून या सर्व व्हिसाधारकांना पुन्हा व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्याची मंजुरीही महिनाभरात मिळाली. चेन्नईतील एका व्यक्तीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, चेन्नईस्थित निकटवर्तीय एस. भास्कर रामन, पंजाब प्रायव्हेट कंपनीचे विकास मखरिया, मेसर्स तलवंडी साबो पॉवर लिमिटेड, मानसा (पंजाब), मेसर्स बेल टूल्स लिमिटेड, मुंबई (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. याशिवाय एक सरकारी अधिकारी आणि एक खासगी कर्मचारीही यात सामील आहे. तपास यंत्रणेने त्यांची नावे उघड केलेली नाहीत.
मनी लाँड्रिंगशी संबंधित हे प्रकरण 2007 सालचे असून ते आयएनएक्स मीडिया कंपनीशी संबंधित आहे. शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी हे कंपनीचे संचालक होते. हे दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत. आरोपांनुसार, पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना लाच घेऊन आयएनएक्स मीडिया हाऊसला 305 कोटींचा निधी घेण्यासासाठी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून मंजूरी मिळवून दिली होती.
