देवेंद्र फडणवीस यांचे चार ओळीचे ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन ट्विट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह हे ट्विट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस या पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे अनेक खात्यांचा भार होता. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन आठ महिने झाले आहेत. या आठ महिन्यात फडणवीस यांनी कधीच ऑफिसच्या कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केलं नव्हतं. तसेच मुख्यमंत्री असतानाही त्यांनी असं ट्विट केलं नव्हतं. फडणवीस यांनी पहिल्यांदाच हे ट्विट केलं आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय संकेत द्यायचे आहेत? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. रात्री उशिरापर्यंत ते फाईल क्लिअर करत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असली तरी भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे सहा सहा विभागांची जबाबदारी आहे. कोणत्याही विभागाची कामे प्रलंबित राहू नये हा फडणवीस यांचा स्वभाव आहे. जनसेवेच्या फाईल पेंडिंग नसाव्यात. त्यामुळे फडणवीस फाईल क्लिअर करत आहेत. त्यामुळे फडणवीस उशिरापर्यंत काम करत आहेत. त्याचा कोर्टाच्या निकालाशी काहीच संबंध नाही. फाईल उशिरापर्यंत क्लिअर करत असल्याने सरकार जाईल, असा अर्थ काढणं योग्य नाही, असं भाजप सूत्रांनी म्हटलं आहे.