लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन नसून आपला भारत देश आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे.

युनायटेड नेशन्स च्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 मधील डेटा चीनच्या 1.4257 अब्जांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 1,428.6 दशलक्ष किंवा 1.4286 अब्ज आहे.

ताज्या अहवालात असंही दिसून आलंय की, भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 आहे. म्हणजे, भारतात एक महिला 2 मुलांना जन्म देते. भारतीय पुरुषांचं सरासरी आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचं 74 वर्षे आहे.

चीनमध्ये 65 वर्षांवरील लोकांची संख्या 20 कोटी, म्हणजेच वयोवृद्धांची संख्या चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट आहे. काही दशकांपूर्वी, चीन सरकारने 1 मूल धोरण लागू केले होते, सरकारच्या या धोरणामुळे लोकांनी मुलांना जन्म देणेच बंद केले होते.