दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कृतीशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा कटाक्ष आहे, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात राज्य शासन, मुंबई महानगरपालिका व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समावेश- मेकिंग मुंबई इनक्ल्युझिव्ह मोहिमेचा शुभारंभ तसेच दिव्यांगांना व्हिलचेअर वितरण, त्यांच्या बास्केटबॉलचा विशेष सामना या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रोजेक्ट मुंबई उपक्रमाचे संस्थापक शिशिर जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य, व्हिलचेअर वितरणाचा आजचा उपक्रम स्वागतार्ह आहे. दिव्यांग खेळाडूंना इतर सर्व खेळाडूंप्रमाणे समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आग्रही असून त्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे. हा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून या विभागामार्फत सद्यस्थितीत दिव्यांगांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने विविध विषय हाताळण्यात येत आहेत. दिव्यांग खेळाडूंना क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी, विविध खेळ खेळण्यासाठी महानगरपालिकांची उद्याने, तसेच इतर मैदाने, जागा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी सुलभरित्या येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या रॅम्प, सरकते जिने, दिव्यांगासाठीचे शौचालये यासह आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.