आशा भोसलेंना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

यंदाचा “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली. गतवर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाचे या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकानुसार यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालन विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो

गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ लतादीदींच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान केला जाईल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.