2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता आहे. लखनौ संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या कामगिरीत सातत्य न राखल्याने त्यांची बुधवारच्या सामन्यात राजस्थानसमोर सत्त्वपरीक्षा राहिल.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सने तीन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. लखनौ संघाचा यापूर्वी झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना डावातील मधल्या षटकामध्ये अधिक धावा घेता आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी त्यांना विजयासाठी 10 ते 15 धावा कमी पडल्या. लखनौ संघाचा कर्णधार के. एल. राहुलला फलंदाजीचा सूर पुन्हा मिळाल्याने बुधवारच्या सामन्यात त्याच्याकडून पुन्हा मोठी खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. राहुलने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 56 चेंडूत 74 धावा झळकवल्या होत्या.
लखनौ संघाने मधल्या फळीत अधिक धावा जमवल्या नसल्याने त्यांना विजयापासून वंचित व्हावे लागले होते. लखनौ संघाकडे कायली मेयर्स, निकोलास पुरन तसेच मार्कुस स्टोइनिस हे भरवशाचे फलंदाज असून यांच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता निश्चितच आहे. पॉवरप्ले दरम्यान मेयर्सने आतापर्यंत अधिक धावा घेण्यात यश मिळवले आहे. डावातील पहिल्या चार षटकात आक्रमक फटकेबाजी केली तर त्यांना मोठी धावसंख्या नोंदवता येईल. दरम्यान दीपक हुडा फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात नवोदित रवि बिस्नोईला उशिरा आणल्याची चूक झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. के. गौतम आणि कृणाल पांड्या हे या संघातील उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. मार्क वूड आणि आवेश खान हे लखनौचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या संघातील युधवीर सिंग चरककडून सातत्याने धावा नोंदवल्या जात आहेत. सध्या राजस्थानचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात अग्रस्थानावर असून त्यांना खाली खेचण्यासाठी लखनौला बुधवारच्या सामन्यात प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.
राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी भक्कम असून यशस्वी जैस्वाल, बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. या खेळाडूंनी राजस्थान संघाच्या डावाला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली असून पॉवरप्ले दरम्यान अधिक धावा जमवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या बटलरने सर्वाधिक म्हणजे 204 धावा जमवल्या आहेत. तर जैस्वालने 136 धावा जमवल्या आहेत.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सॅमसनने 32 चेंडूत 7 धावांची खेळी तसेच हेटमेयरने 26 चेंडूत 56 धावांच्या खेळीने राजस्थानला हा सामना जिंकता आला. राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी भक्कम असून त्यांच्याकडे यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि झम्पा हे तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. या फिरकी गोलंदाजांनी राजस्थान संघाला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता.
