मुंबई : जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार,’ असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितले असले तरी शरद पवारांचा त्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या सर्व आमदारांची वैयक्तिक संपर्क साधल्यानंतर आता अजितदादांचे पंख कापण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यापासून अजित पवार यांना दूर ठेवण्यात आले आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. मात्र या शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार यांचे नाव नाही. त्यामुळे अजित पवार या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या अशा कार्यक्रमात अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली आहे.
या शिबीरात शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, अनिल देशमुख यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. मात्र, या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये अजित पवारांचे नाव मात्र वगळले आहे. या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 हजारहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही मोठी फूट पडू शकते, अशी भीती शरद पवारांना वाटतेय. त्यामुळे त्यांनी अजितदादांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली आहे. इतकेच नव्हे, पक्षाच्या आमदारांशी ते फोनवर चर्चा करून मन जाणून घेत आहेत. त्यांना संयम राखण्याच्या सक्त सूचनाही देत आहेत. आमदारांची संपर्क साधल्यानंतर शरद पवारांनी अजित दादांना मेळाव्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सारे काही आलबेल नाही असेच राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे.
