मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडकर यांचा मुलगा सुजात आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मिडिया सिर्फ मोदी के गोद मे नही है, अशा शब्दांत सुजात आंबेडकरने निखिल वागळे यांना सुनावले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मला ॲानलाईन धमक्या देत आहेत. माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी वागळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
निखिल वागळे वर्षभर म्हणतात की वंचित ही भाजपची बी टीम आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाची भाजपला मदत होते.आणि जर भाजपचा पराभव करायचा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली पाहिजे. मात्र अजित पवार भाजपसोबत जाणार अशा बातम्या येतात तेव्हा हेच वागळे म्हणतात की, अप्रतिम पत्रकारिता! ही बातमी ब्रेक केल्याबद्दल बातमीदाराचं अभिनंदन, असे ट्विट सुजातने केले होते.
त्यावर निखिल वागळे यांनी या विषयावर प्रकाश आंबेडकरांशी जाहीर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. तुझ्याकडून मूर्खपणाने ट्रोलिंग केले जात आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मिडिया सिर्फ मोदी के गोद मे नही है. #गोदीमिडिया असे म्हणून सुजातला असं सुचवायचंय की मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोदीत बसून वंचितवर टीका करतोय. तशी मिम्सही प्रसारित करण्यात आली. हे विलक्षण अपमानास्पद होतं. मी माझ्या पत्रकारितेत एकाही राजकीय पक्षाला सोडलेलं नाही. मग सुजात असं का म्हणतोय? म्हणून मी त्याला उत्तर दिलं आणि गप्प बसलो. पण नंतर सुरु झाला भडीमार. शिविगाळ करणाऱ्या, जातीवाचक पोस्ट्सचा. तो दिवसभर चालला. मला हैराण करण्याच्या हेतूने हे सगळं केलेलं दिसत होतं. २०१९च्या निवडणुकीच्या वेळी मी वंचितवर केलेल्या टीकेची क्लिपही यासोबत सुजातने दिली होती.
निखिल वागळे या टीकाकाराला धडा शिकवण्यासाठी हा सगळा थिल्लर प्रकार करण्यात आला असावा.ट्रोलींगची कितीही सवय असली तरी मनस्ताप हा होतोच. ‘सुजात आंबेडकरला तुम्ही थिल्लर का म्हटलंत?नेमकं काय झालं?…’ हे प्रश्न विचारले जाताहेत. वास्तविक या प्रकरणावर मी पडदा टाकणार होतो. झाला तेवढा मनस्ताप पुरे झाला, असं मला वाटत होतं. पण सत्य दडवून कसं चालेल? म्हणूनच सुजातच्या कुरापतीची कहाणी आज सांगणार आहे, असा इशाराही वागळे यांनी दिला होता.
