ठाकरे गटाचा गेम प्लॅन, भावाच्या विरोधात बहिणीला उभे करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न

जळगाव : जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना मोठा दणका बसून शिवसेनेचे पाचही आमदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे क्षण झालेली ठाकरे गटाची ताकद दाखवण्यासाठी आता ठाकरे गटाने नवा गेम प्लॅन केला आहे. भावाच्या विरोधात बहिणीला उभे करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सेनेचे सर्वच्या सर्व पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले होते. या घटनेनंतर जळगाव जिल्हयात ठाकरे गटात मोठे खिंडार पडले. या पार्श्वभूमीवर 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हयात पाचोरा येथे येत आहे.

माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या सभेचे आयोजन केले आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे गटाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्याच बळावर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत वावगे बोलल्यास आत घुसू असा इशारा दिला आहे.