भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत, असं नागरोटा इथल्या लष्कराच्या 16 कॉर्प्सने सांगितलं.
राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केल्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं, मात्र हल्लेखोरांचा तपशील अद्याप सापडलेला नाही.
एक जवान गंभीर जखमी झाला आहे.जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी संपूर्ण पूंछ जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काश्मिरमधील या भ्याड हल्ल्याबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
लष्कराकडून सांगण्यात आलं की, “गुरुवारी दुपारी तीन वाजता राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पुंछ दरम्यान महामार्गावरुन जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागली असावी.” “हल्लेखोरांनी मुसळधार पाऊस आणि परिसरातील कमी दृश्यमानतेचा फायदा घेतला,” असं लष्कराने निवेदनात म्हटलं आहे.
