पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट फसवणुकीने मिळवणे तसेच 3 कोवीड रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेसचा विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 अंतर्गत काल रात्री गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राजू ठाणगे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, कोरोना काळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्यसुविधा अपु-या पडत असल्याने या जम्बो रुग्णालयाची उभारणी करायची होती. लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेसला हे कंत्राट देण्यात आले. त्यांनी काम सुरू केले. मात्र महापालिका आयुक्त यांना यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. निवीदा प्रक्रियेनुसार 800 बेडसाठी निश्चित करण्यात आलेला आवश्यक वैदयकीय तज्ञ अधिकारी वर्ग व अन्य वैदयकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. जंबो कोबी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना नाश्ता व भोजन वेळेत उपलब्ध होत नाही अशी तक्रार प्राप्त होत आहे. डेड बॉडी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने आय.सी.एम.आर. पोर्टलवर नोंदणी करणे शक्य झालेले नाही.
जंबो रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी 50 बेड उपलब्ध करण्याचे निर्देश देवूनही फक्त 10 बेड उपलब्ध करण्यात आले. सर्व रुग्णांना दाखल करून घेणे अपेक्षित असतानाही रुग्णांचा पूर्वइतिहास उपलब्ध नाही म्हणून रुग्णांना दाखल करून घेतले जात नव्हते. या त्रुटींमुळे लाईफलाईन हॉस्पीटल मैनेजमेंट सर्विसेस यांची सेवा खंडित केली. तसेच त्यांना काळया यादीत समाविष्ट केल्याबाबत आदेशदेखील निर्गमित केले.
लाईफलाईन हॉस्पीटल मैनेजमेंट सर्विसेस यानी बृहन्मुंबई महानगरपालीका, मुंबई यांचेकडे सादर केलेली कागदपत्रे उदा. भागीदारी पत्र तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या भागीदारी पत्रामध्ये तफावत असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. सदोष अथवा बनावट असे भागीदारी पर बृहन्मुंबई महानगरपालीका अथवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना सादर केलेले आहे.
