‘2024 ला मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे. तसेच मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही अजित पवार म्हणाले होते. पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या कार्यक्रमानंतर काही वेळातच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत बॅनर लावले आहेत.
त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. कोथरूडमध्ये अचानक अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. ज्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाली. त्यावर मला भाष्य करायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, मुख्यमंत्री पदावर आमचा अजूनही दावा असल्याचं सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबेही त्यांनी जाहीर केले.
