तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात – रावसाहेब दानवे

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांच्या या इच्छेला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. तसेच बोलता बोलता दानवे यांनी अजितदादांना मोठी ऑफरही दिली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळं दावा करणं आणि बहुमत असणं वेगळी गोष्ट असल्याचे दानवे म्हणाले. अजित पवार बहुमताच्या बाजूने आले किंवा दहा-वीस वर्षांनी त्यांना कदाचित बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाजही दानवेंनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेनेतून फूटून आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा सरकारी यंत्रणांनी मदत केली असा आरोप अजित पवारांनी केला होता. या आरोपांचे दानवेंनी खंडन केलं. जर आमदार संरक्षण मागत असतील तर राज्यघटनेप्रमाणं त्यांना संरक्षण देण्याचं काम सरकारी यंत्रणा करते. सरकार बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत सरकारनं केली नसल्याचा खुलासा दानवेंनी केला.