प्रियांका म्हणतात लड़की हूं, लड़ सकती हूं आणि छळवणुकीची तक्रार करणाऱ्या महिलेचीच पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी एका बाजूला म्हणतात लड़की हूं, लड़ सकती हूं आणि त्याच काँग्रेसमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून झालेल्या छळवणुकीची तक्रार करणाऱ्या महिलेचीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तीन दिवसापूर्वी आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंकिता दत्ता यांनी यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप केला होता. त्याची दखल घेऊन कारवाई करणे तर दूरच डॉ. दत्ता यांचीच पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशव कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

काँग्रेसचा ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ही घोषणा खोटी ठरली, अशा शब्दात भाजपच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी टि्वट करीत काँग्रेसच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. “महिला सक्षमीकरणाचे हे माँडेल आहे, छळाचा आरोप करणाऱ्या महिलेची तक्रार ऐकून घेण्याऐवजी तिला पक्षातून काढून टाकण्यात आले. ही बाब महिलासाठी अयोग्य आहे,” असे मालवीय यांनी म्हटलं आहे.

“मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास बीवी आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणुक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते ‘ए लडकी’ असा उल्लेख करीत असतात, असे डॉ.अंकिता दत्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.