अजितदादांचे कथित बंड आणि शरद पवार यांचा भाकरी फिरविण्याचा इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नाराजीमुळे कथित बंडाची चर्चा सुरू आहे. याच वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा इशारा दिला आहे. पवार यातून कोणावर निशाणा साधत आहेत अशी चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही, असे सांगून शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 35 हून अधिक आमदार त्यांच्यासोबत असल्याचे पुढे आले होते. या सगळ्या आमदारांशी पवार यांनी स्वतः संवाद साधला होता. आता भाकरी फिरविण्याचा इशारा देऊन या आमदारांना पुढील निवडणुकीत धडा शिकविण्याची तयारी शरद पवारांनी सुरू केली का असाही सवाल केला जात आहे.

शरद पवार म्हणाले की, मी पक्षाचे प्रांताध्यक्ष, इतर नेते आणि मुंबईचे कार्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगणार आहे की, जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करावा. युवकांना संघटनेत घ्यावे. त्यातून त्यांना कामाची संधी द्यावी. या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी द्यावी.समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल.