कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार आहे. त्याआधी जोरदार प्रचार सुरू आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील कर्नाटकमध्ये प्रचार करत आहेत. आपल्या खास अंदाजात त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षातील फरक सांगितला आहे.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्या सरकारमधला फरक लोकांना स्पष्टपणे आणि अगदी स्वच्छपणे दिसतो आहे. काँग्रेस सरकार म्हणजे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढवणारं सरकार आणि भाजपाचं सरकार म्हणजे विकासाचे नवे रेकॉर्ड स्थापन करणारे सरकार आहे हे लोकांना माहित आहे. डबल इंजिनच्या सरकारने कर्नाटकचा चांगला विकास केला आहे. तसंच शेतकऱ्यांच्या हिताचीही कामं केली आहेत. भाजपाने शेतकऱ्यांनाही सन्मान दिला आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचं काम बोम्मई सरकारने आणि मोदी सरकारने मिळून केलं आहे अस त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस स्वतः भ्रमात आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सांगितलं की काँग्रेस पक्ष संपवा. कारण काँग्रेसची स्थापना आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केली होती. मात्र पंडित नेहरुंनी महात्मा गांधी यांचं ऐकलं नाही. मात्र आता राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचं ऐकलं आहे आणि त्यांनी संकल्प सोडला आहे की काँग्रेस पक्ष संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काँग्रेस पक्ष आता हळू हळू संपतो आहे. काँग्रेसचं अस्तित्व अशाच पद्धतीने संपणार आहे.” असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
आपल्या भाषणात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “तीन सी ही काँग्रेसची ओळख झाली आहे. करप्शन, क्राईम आणि कमिशन असे हे तीन सी आहेत. तर भाजपाची ओळख म्हणजे कनेक्टिव्हीटी, रोड कनेक्टिव्हीटी आणि एअर कनेक्टिव्हीटी आहे. तसंच स्वच्छता आणि विकासावरही भाजपाने भर दिला आहे. “
