खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवारांशी पंगा, जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती

सांगली : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली असताना त्यांच्याच पक्षातील खासदाराने विरोध केला आहे. अजित पवार यांच्यापेक्षा जयंत पाटील यांना पसंती देऊन पंगा घेतला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे स्पष्टपणे सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजितदादा विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष उफाळून आला आहे. विशेष म्हणजे डॉ. कोल्हे हे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा रंगत असताना पुण्यानंतर आता नागपुरातही अजित पवारांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का’ असा मजकूर लिहिलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अजित पवार हे भाजपशी सलगी करणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. डॉ. कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी जयंत पाटील यांचे नाव घेऊन अजित पवारांशी पंगा घेतल्याची चर्चा आहे.