मॉरिशसमध्ये घुमला शिवछत्रपतींचा जयघोष, महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय. आज मॉरिशस पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

मॉरिशसमधील मराठी समुदायाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपस्थित मराठी बांधवांनी पारंपरिक महाराष्ट्र पद्धतीची वेशभूषा केली होती. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित बांधवांशी मराठीत संवाद साधला. “मॉरिशस हे खरंतर एक लहानसं बेट आहे. महाराष्ट्र प्रदेश भौतिकदृष्ट्या आमच्यापासून कोसो दूर आहे. तरीही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आमच्या नसानसांत वाहत असते. महाराष्ट्र आणि मॉरिशससाठी आज अभिमानाचा दिवस आहे. हा पुतळा भारत सरकारकडून मॉरिशसला भेट देण्यात आला आहे”, असे या कार्यक्रमाच्या निवेदनात सांगण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवराय फक्त राजे नव्हते, ते द्रष्टे होते. त्यांनी ज्याप्रमाणे राज्यव्यवस्था घडवली त्यात कोणताही भेद नव्हता. कोणालाही विशेष दर्जा नव्हता. चूक करणाऱ्यांना शिक्षा होती, चांगलं वागणाऱ्याला प्रोत्साहन होतं.

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव राहतात. यात प्रामुख्याने पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून गेलेले बरेच मराठीजन आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या विविध सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून १ मे १९६० रोजी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. याद्वारे ‘महाराष्ट्र दिन’, ‘शिवजयंती’, ‘गुढीपाडवा’, ‘गणेश चतुर्थी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मॉरिशसमध्ये एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकाराचा भारताबाहेर केलेला हा चौथा कार्यक्रम आहे. यापूर्वी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसंच रशियात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण त्यांनी केले होते आणि आज हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. यात गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा, इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.