“पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार”, जयंत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत आणि नाना पटोलेचे उत्तर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काल एक मोठं विधान केलं होतं. राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असं ते म्हणाले होते. त्यावर संजय राऊत आणि नाना पटोलेनी उत्तर दिले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत तिन्ही पक्षाची वेगवेगळी वक्तव्य समोर आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मविआमध्ये एकवाक्यता नाही अशा चर्चा सुरु आहे.

नाना पटोले म्हणाले,”जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणाच्या आधारे विधान केलं हे मला माहिती नाही. ज्यांच्या आमदारांची संख्या जास्त असते, त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे सध्या काँग्रेसला यावर चर्चा करायची नाही”, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “त्यासाठी आपण आधी एकत्र बसू… मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं, हाही महाविकास आघाडीचाच निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेतले जातील.