भिवंडीतल्या वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही बचावकार्य सुरूच आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असं ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्यानं देण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत इमारत कोसळल्यानतंर ढिगार्याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले. मागील सहा तासात एकूण 11 रहिवाश्यांच्या सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर एकूण 4 रहिवाशांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून अजूनही शोधकार्य सुरू आहे.वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
