आयपीएलचा 1000 वा सामना; आज मुंबई-राजस्थानमध्ये लढत

आयपीएलचा 1000 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई संघासमोर सलग तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान असेल. गेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबईला गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केल्यानंतर राजस्थान संघाचा उत्साह वाढलेला आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे.

आजचा सामना जिंकून दोन्ही संघ अधिक गुण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्स हा यंदाच्या मोसमातील आघाडीच्या संघांपैकी एक आहे. राजस्थान संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानने आतापर्यंत आठ पैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 आहे.

संभाव्य प्लेइंग-11
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल बडेरा, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, अॅडम झम्पा, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि जेसन होल्डर.