शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांचा विरोध

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, नेते व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार आता काय बोलतात? आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राजकीय जीवनातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यकर्त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले.