उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय.

उद्धव ठाकरे उद्या 6 मे ला बारसूला जाणार आहेत.मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. मात्र आता सभेची परवानगी नाकारल्यामुळे आता ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे उद्या शनिवारी आंदोलकांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे. रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संमती पत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.