राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तेंव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
