शिरूरमधून अनेकजन निवडणूक लढवण्यास इच्छूक असतील तर बिघडले कुठे? – अजित पवार

पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जाते. मात्र या जागेवर आता राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मविआतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पुण्याच्या जागेवरून मतभेद असतानाच आता दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून देखील शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असतील, तर बिघडले कुठे? असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया दिली. अजित पवार शिरूरमधून इच्छुक असतील तर तुम्हाला त्रास काय आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. पक्षाचे नेते शरद पवार चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. सक्षम उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल, असे पवार यांनी सांगितले.

खासदार कोल्हे आणि विलास लांडे या दोघांचेही वक्तव्य ऐकलं आहे. तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. येथे तोडीस तोड उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. मागील वेळी अमोल कोल्हे हेच शिरुरसाठी योग्य उमेदवार वाटतात असे सांगून मी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. त्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आले आणि निवडून आणले, असे पवार म्हणाले.