तुझ्या मालकाची महाविकास आघाडीमधील लायकी शरद पवारांनी दाखवून दिली; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरेंची लायकी शरद पवारांनी दाखवून दिली, असा हल्लाबोल राणे यांनी केला.

राणे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षाबाबतच्या निकालाचा खरा अर्थ शरद पवार यांना समजला आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचा गट म्हणतोय की निकालाचा अर्थ राज्यात समजावून सांगा. पण त्यामुळे काहीही उपयोग होणार नाही.उद्धव ठाकरे सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत. यावरून टोला लगावताना राणे म्हणाले, दुसऱ्याच्या पैशावर परदेश वाऱ्या करत आहेत. त्यांनी आता लंडन एखाद्या हॉटेलमध्ये रूम घ्यावी. त्याला मातोश्री असे नाव द्यावे आणि तेथेच राहावे. महाराष्ट्रात कोणालाही त्यांची गरज नाही.