रायगडावरील कार्यक्रम राजकीय राजकीय असता तर सुनील तटकरेंना कार्यक्रमाला बोलवलं असतं का? – उदयनराजे भोसले

३५०व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर राज्य सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, भाजपा खासदार उदयनराजे भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे तिथून निघून गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंनी केलेल्या आरोपांवर उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तरादाखल खोचक सवाल केला आहे.

आज सकाळी शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडत असताना सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. यावेळी विरोधी पक्षातील एकच नेते, जे रायगडचे खासदार आहेत, ते सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेकाचे विधी आटोपल्यानंतर तटकरे तिथून निघून गेले. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.मला वाटलं होती की ,छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी मला बोलता येईल. पण स्वयंघोषित स्वागताध्यक्षांनी याठिकाणी भाषण केलं. त्याविभागाच्या मंत्र्यांनी भाषण केलं असतं तर मी समजू शकलो असतो. पण राजकीय हेतूने ज्या घटना घडल्या त्यामुळे माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस त्याठिकाणी थांबू शकत नाही, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, तटकरेंच्या या आरोपांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील तटकरे आत्ता कुठल्या पक्षातले आहेत? हा कार्यक्रम शासकीय नसता, राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं असतं का?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे.दरम्यान, यावेळी कार्यक्रमासंदर्भात टीकात्मक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर उदयनराजे भोसले यांनी टीका केली आहे. “या लोकांचे कुणी हात पकडले होते का? कुणी थांबवलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, पण असे कार्यक्रम तुम्ही घेत नाही. तुमचा नाकर्तेपणा किंवा आळशीपणा लपवण्यासाठी एखादा मनापासून असा कार्यक्रम नियोजित करत असेल, तर नाव ठेवण्याचं काय कारण? तुम्ही करा ना? तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान.कार्यक्रमानंतर या प्रकरणावर मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा 350 वा सोहळा होता. हा कुणाच्या मान-अपमानाचा सोहळा नाही. हा छत्रपतींचा सोहळा असून प्रत्येकाने लीनपणे यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.