छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे.देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण सगळ्यांनी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून आज आपल्याला येथे या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं.या राष्याभिषेकाने नवी नाणी तयार केली. परकीयांच्या तावडीतून गडकिल्ल्यांची सुटका करून त्यांचे नवे अस्तित्व निर्माण केले. भाषा शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या राजमुद्रेवरील इंग्रजांची राजमुद्रा काढली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ठेवली.
महाराष्ट्रात सध्या शिवसेना-भाजपचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानेच सुरु असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. “महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात खऱ्या अर्थाने छत्रपतींनी स्वराज्याच्या निर्मितीतून केली. आणि याठिकाणी केवळ स्वराज्य नाही तर अखिल भारताला नव्हे तर अखिल जगाला दाखवून दिलं जाणते राजे म्हणजे काय असतात. राज्य कारभार कसा चालविला पाहिजे. सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे म्हणून जगाच्या इतिहासात न्याय प्रिय राजे म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव नोंदवले गेले आहे.” असा शिवरायांच्या कार्याचा गौरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आमदार भरत गोगावले यांनी शिवसृष्टीसंदर्भात मागणी केली आहे. त्यासाठी माझेही समर्थन असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिफारस करतो. त्यानंतर छत्रपती उदयनराजे यांनी राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे. त्यांनी मी विश्वास देतो की मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ आणि दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक तयार करू, असे फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, भरत गोगावले, आ. बच्चू कडू आदी उपस्थित होते.
