येत्या 9 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला 24 वर्ष पूर्ण होत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने केडगाव, अहमदनगर येथे महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहेत. या राज्यस्तरीय मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आज पुण्यात आढावा घेत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. कामं करा. कामं नाही केली तर एकएकाच्या कानाखाली आवाजच काढेन, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे चेहरेच पडले होते.
या बैठकीत अजित पवार यांनी नेत्यांना काही सूचना आणि विनंती देखील केली आहे. तर या बैठकीत बोलताना पवार यांनी 9 तारखेला असणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ‘तुम्ही देखील मीटिंग घ्या, तयारी सुरू करा. आपल्यावर खूप मोठी जबाबदार आहे, मुळशीच्या लोकांनी देखील काम करायचं आहे. त्यांना देखील पद दिली आहेत. भाडायचं नाही, नाहीतर एका-एकाच्या कानाखाली आवाज काढीन, बाकी काय नाही करणार. यातुन आमची बदनामी होते. तुमची नाही असं म्हणत अजित पवारांनी नेत्यांना तंबी दिली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याने आपली ताकद असलेल्या जागांची चाचपणी सर्व पक्षांकडून केली जातेय. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संवाद वाढले आहेत. म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध मतदारसंघातील आपली ताकद ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार चेतन तुपे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला होणार सुरुवात झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेणार आहेत.
