औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असू शकत नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी ठेवलेल्या व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांवर लक्ष्य केलं आहे. अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्याकरता गेले होते. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मागील महिन्यात कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘पन्हाळा, जयसिंगपूर येथील घटना, तसेच सोशल मीडियावरून फिरणारे संदेश पाहिल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर काल शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडली.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संशयाची सुई अप्रत्यक्षपणे सतेज पाटलांकडे टोकावली आहे.

अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगा याेग नाही हे आम्हांला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाचे वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न असे म्हणणे आणि औरंगजेबचे उदात्तीकरण हाेणे याचा तपास सुरु आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले.

या सर्व प्रकरणात सरकारने लक्ष घातलं पाहिजे, असं शरद पवार आज म्हणाले. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मला हे स्पष्टपणे दिसायला लागलंय की हे सर्व एका भाषेत बोलत आहेत. एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहेत. आता इथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ती का होतेय? तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करताहेत म्हणून होते. आम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांचे काही नेते औरंजेबाला देशभक्त ठरवायला निघाले आहेत. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहितेय. सर्व एकाचवेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची चौकशी करायलाच पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दोन दिवसांपूरवी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. नगरमधल्या फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरणूकीत काही तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते.