तिरुपती श्री बालाजीचे दर्शन आता महाराष्ट्रातूनही घेता येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आता तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे. नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी सकाळीच प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. ज्यांना प्रत्यक्ष तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथे होणाऱ्या मंदिरामुळे दर्शन घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलवे ता. उरण येथे केले.उलवे, सेक्टर १२, नवी मुंबई येथे दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

भूमिपूजन समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आनंद देणारा हा सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकालाच आंध्र प्रदेशात जावून तिरुपती श्री बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा सर्वांना येथे तिरुपती श्री बालाजीचे दर्शन होणार आहे. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.
महाराष्ट्रात तिरुपती श्री बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल तिरूमला ट्रस्टचे तसेच या पवित्र कामात ज्यांचे सहकार्य लाभले आहे, त्या सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. यावेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष रेड्डी यांनी हे मंदिर कशा पद्धतीने साकारण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती सादर केली.

नवी मुंबईत तिरुपती तिरुमाला संस्थानच्या वतीनं मंदिर उभारलं जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौतम सिंघानिया, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. तिरुपती तिरुमाला मंदिराच्या व्यवस्थापन नवी मुंबईत मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करणार आहे. या रकमेची उभारणी दात्यांकडून आणि भक्तांकडून आलेल्या देणगीतून करण्यात येणार आहे.