आशिष देशमुख यांची भाजपमध्ये ‘घरवापसी’; या दिवशी गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकांआधी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आमदारकीचा राजीनामा देणारे नेते आशिष देशमुख यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आशिष देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. पण आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका करत आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता पुन्हा पाच वर्षांनी ते भाजपात घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं आहे. काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 18 जूनला नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा फोटो समोर आला आहे. आशिष देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

आशिष देशमुख यांच्यामुळे नागपुरात काँग्रेसचा प्रभाव होता. पण आता त्यांच्या नसण्याने काँग्रेसला हा गड लढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. देशमुख यांनी पक्षाच्या नेतृत्वात बोलल्याने आणि कायमच पक्षाच्या विरोधातील वक्तव्य केल्याने त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे आता काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी झाल्याने ते पुन्हा एकदा भाजपमध्ये पुनरागमन करणार आहेत.

आशिष देशमुख हे येत्या 18 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे भाजपच्या तिकीटावर काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.