आषाढीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस येण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून निमंत्रण देण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीच्या सदस्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आषाढीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण दिले. एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. गतवर्षी राज्यात अचानक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना विठुरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता.

ज्ञानोबारायांच्या पालखीने 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. ती 28 जून रोजी पंढरीत पोहचेल. ज्ञानेबांची 29 जून रोजी विठूरायांसोबत गळाभेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीने देहूतून 10 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेले आहे. ती 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जून रोजी तुकोबांची पालखी सहभागी होणार आहे आणि याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट होणार आहे.

यंदा उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. यामध्ये यात्रा काळातील सोयी सुविधांवर चर्चा झाली. यामध्ये उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेवून गर्दीच्या ठिकाणी स्प्रींकलर (पाण्याचे फवारे) बसविण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार निवृत कर्नल सुपानीकर यांनी दिली.