बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यासंदर्भात उपाययोजना केंद्र अन् राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. परंतु शेतकरी ज्याची वाट पाहत आहे, तो मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. राज्यात मान्सून येऊन चार दिवस झाले आहेत. ११ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती. मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे सांगण्यात आले आहे. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ८.८ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे खरिपाची पेरणी रखडली आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ०.७७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला फटका बसला आहे.
चार जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला असताना ते उशिरा झाले. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती कमी झाली आणि महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे पोहोचलाच नाही. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक राज्यांना धोका निर्माण झाला आहे. भारतात अनेक ठिकाणी मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे अनेक राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
8 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यापाठोपाठ तो 11 जूनला तळकोकणात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. पण मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची कामं करु नये असे हवामान खात्याने सांगितले होते. पण अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामं केली. पण काही चांगला पाऊस पडत नसल्यामुळे हे शेतकरी चिंतेत आले आहेत. यावर्षी मान्सूचे उशिरा झालेल्या आगमनाचा परिणाम शेतीवर होणार आहे. कारण चांगला पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली आहेत.पावसाने हुलकवणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने मान्सून आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी खते, औषधे, बियाणे खरेदीसाठी बाजार पेठेत लगबग सुरु झाली आहे.
