शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलतांना उद्धव ठाकरेंनी कोरोना लशीवरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला होता. मोदींची लस तयार केल्याने आपण जिवंत आहोत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी असल्या लोकांना समीर चौगुलेंच्या दवाखान्यात मानसिक उपचार करायला पाहिजेत, अशी टीका केली. याच दरम्यान आता भाजपने पलटवार करत उद्धव ठाकरेंनी डिवचलं आहे. भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे गटाला टोचणारे सवाल उपस्थित करत त्यांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले आहे.
”महाराष्ट्र आता फक्त होर्डिंग लाऊन उबाठाला विचारतोय… औरंगाबाद की संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? विरोधी की हिंदूत्व? कबर की प्रतिमा? आणि औरंगजेब की सावरकर? मर्द, खंजीर… शब्द न वापरता… उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे… यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल गाणी”
दरम्यान, मुंबई महापालिकेवरून भाजप आणि ठाकरे गटात युद्ध सुरू आहे. मुंबईला माय बाप राहिले नाहीत. लुटालूट सुरू आहे. या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी 1 जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकारण सध्या तापले आहे.
दोन दिवसांपूर्वी ईडीने ठाकरेंच्या निकटवर्तियांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या कारवाईमुळेही ठाकरे गट खवळून उठला आहे. कोविड काळातील घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियांची चौकशीही करण्यात आली आहे. यावरून वाद चांगलाच वाढला आहे. आता यावर ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ठाकरे गट आणि भाजपातील आरोप प्रत्यारोपांचे राजकारण वाढत जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
