मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; मुंबई, पुण्याला स्फोटानं उडवण्याची धमकी

मुंबई पोलिसांना येणाऱ्या धमक्यांचे फोन काही थांबण्याचं काही नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन खणाणला आणि पुन्हा एक धमकीचा मेसेज मिळाला. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे बॉम्बनं उडवण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली. तसेच, अंधेरी, कुर्ला भागात उद्या (24 जून 2023) संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीनं धमकीचा फोन करणाऱ्याला अटक केली आहे. सुमारे 25 ते 30 वर्षांच्या आरोपीला मुंबईत आणण्यात आलं आहे. कॉल करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपीची वेगवेगळी नावं असून तो पोलिसांना त्याचं खरं नाव सांगत नाहीये. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

फोन करणाऱ्या कॉलरने पुढे दावा केला की, पुणे शहरातही बॉम्बस्फोट होणार आहेत, तो स्वत: हा स्फोट घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु आपणास फक्त दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या माणसांसोबत मलेशियाला निघून जाऊ, असा दावा कॉलरने केला आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. त्यांनी फोन कोठून आला? याचा शोध सुरु केला. कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान फोनवर अज्ञात व्यक्तीशी विमान हायजॅक करण्याची वल्गना करत विमानात दहशत पसरवू पाहणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सहार पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अटक केलेला तरुण हा मूळचा हरियाणाचा आहे. तो दिल्ली ते मुंबई विस्तारा या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होता.