ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगताना सध्या पाहायला मिळत आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी पाटण्यात विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांच्या बैठकीतून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. आता त्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं. याला आता एकवर्ष होत आलं तरीही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कमी होत नाहीत. नुकताच विरोधकांनी गद्दार दिवस साजरा केला. दरम्यान, शिंदेंनी बंड केल्यामुळं ठाकरे गट शिंदे गटाला गद्दार आणि बेईमान म्हणून हिनवतोच. मात्र, राष्ट्रवादीही गद्दार अशी टीका करत असते. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. सभी करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला है, अशी राष्ट्रवादीची अवस्था असल्याचं सांगितलं.
1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं असतं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “आमचं जीवन खुली किताब आहे. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मी किंवा माझ्या परिवाराबाबत तुमच्याकडे काहीही असलं, तरी उघड करून दाखवा. पण लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कुणाच्या भानगडीत पडत नाही,पण पडला तर सोडत नाही. त्यामुळे, एवढं लक्षात ठेवा, ज्याच्या कपाटात सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणण्याचं कारण नाहीये. सांगाडे नक्कीच बाहेर निघतील”, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.
‘जनतेच्या आशिर्वादाने आपलं सरकार आलं, पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीकरता आपल्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायला लागलं तर दुकान बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, पण उद्धव ठाकरे त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले,’ अशी टीका फडणवीसांनी केली.
