आषाढीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचे दर्शन

महाराष्ट्रात सध्या बीआरएस आपले हातपाय पसरत असल्याचं चित्र आहे. आज (26 जून) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या मंत्रिमंडळासहित आमदार आणि खासदारांना घेऊन सोलापुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढपुरात पोहचले आहेत. मुख्यमंत्री शिंदे रविवारी (25 जून) रोजी नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढपुरात पाहणी करुन वारकऱ्यांशी देखील संवाद साधला.

एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे अचनाक भेट देऊन आषाढी वारीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

दरम्यान वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांसाठी ते खूष असून त्यामुळे आपण देखील समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पंढपूर देखील खड्डेमुक्त झालं असून आपण दिलेला निधी पूर्णत्वास गेल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळामध्ये बळीराजा, सामान्य नागरिक सुखी होऊ दे, पाऊस पडू दे इतकचं मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी चंद्रभागा स्वच्छता व पंढरपुरातील इतर वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा देखील आढावा घेतला. तर चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याविषयी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे, विठुराया सर्वांचा आहे.’

मुख्यमंत्री म्हणाले की पंढरपूरमधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डांबरी रस्ते झाले पाहिजेत यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. दर्शनासाठी वारकऱ्यांची रांग लागते तिथं त्यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप उभा केलेला आहे. पाऊस आणि ऊनापासून संरक्षण व्हावं याची काळजी घेतली आहे. हे सगळं नियोजनबद्ध केले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.