जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही’; पवारांच्या विधानाचा बावनकुळेंकडून समाचार

पाटण्यामध्ये १९ विरोधी पक्ष नसून १९ पंतप्रधान जमले होते, अशी टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता. त्यावर आता भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. सत्ताधाऱ्यांची ही टीका म्हणजे पोरकटपणाचं भाष्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर बावनकुळेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सविस्तर पोस्ट टाकली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे, असे म्हणत बावनकुळेंनी शरद पवारांना सुनावले.

“कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.मोदींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य चालू आहे. पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात. पण जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल”, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटच्या शेवटी दिला आहे.

बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटण्यातील बैठकीत १९ पंतप्रधान एकत्र आले होते, या विरोधकांच्या टीकेवर बोलत असताना म्हणाले, हे त्यांचे पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीत पंतप्रधान या विषयाची चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता. पण गेली दोन-तीन दिवस अनेक तथाकथित लोक यावर टीका करत आहेत. लोकशाहीत बैठकीची परवानगी नाही का असा सवाल त्यांनी केला.