3 दिवसांचा वेळ आहे! अबू आझमी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर आली जीवे मारण्याची धमकी

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी सपा आमदाराला व्हॉट्सअॅपवर ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर तक्रार दिल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. सपा आमदार अबू आझमी यांना यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना फोटो पाठवत धमकीमध्ये लिहिलं आहे की, आता फक्त ‘3 दिवसांचा वेळ आहे!’ या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. गेल्याच आठवड्यात राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील धमकी देण्यात आली होती. पवारांनी धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने नैराश्यातून पवारांना धमकी दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर आता अबू आझमी यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे.

याआधी जानेवारी महिन्यामध्येही अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू असीम आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांच्या पर्सनल असिस्टंटचा फोन आला होता.अज्ञात व्यक्तीने कॉलवर शिवीगाळ केली आणि अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.