आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरावर ईडीनं छापा टाकल्या प्रकरणी, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लवकरच हे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहेत. जैस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
एखाद्या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याचे नाव आल्यानंतर चौकशी करणे याला आमचा विरोध नाही; पण ते आरोपी आहेतच अशा पद्धतीने त्यांच्या घरी काही तास ईडीच्या पथकाने चौकशी करणे, कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी भावना या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्याचं समजतंय. जैस्वाल चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; पण त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्यातून काय निर्णय घेण्यात आला, याचा विचार व्हायला हवा. एखाद्याला लक्ष्य करून त्याच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात तब्बल साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते सर्व पैसे वसूल करणार असल्याचाही इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. कोरोना सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लाईफ लाईन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर ईडी कारवाई केली.
या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याचंही सांगण्यात आलं. जयस्वाल यांच्यावरील कारवाईमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरल्याचही सांगण्यात येत होत. सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांचा बळी जात असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
