पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय. शरद पवारांनी केली ती मुसद्देगिरी मग शिंदेंची बेईमानी कशी? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावेळी त्यांनी देश महात्मा गांधी यांच्या विचारावर चालणार, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले, माझं म्हणणं एवढंच आहे की, मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो. त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय अशा शब्दांत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.शरद पवार म्हणाले ते खरं आहे की, १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला असंही फडणवीस म्हणाले.

पुढे ओबीसी वरून फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दाखवण्यापुरतं ओबीसी लागत. प्रमुख संविधानिक पदआली की त्यांना ओबीसी चा विसर पडतो असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला. त्यांच्या पक्षातील नेतेच म्हणतात ओबीसी चा अध्यक्ष करा त्यांच्या पक्षातील नेते जे हळू बोलतात तेच मी मोठया आवाजात बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या दबावात चालतो हे मी सांगण्याची गरज नाही अशी टीका यावेळी फडणवीसांनी केली.

दरम्यान, हा देश महात्मा गांधी यांच्या विचारावर चालणार. त्यामुळे देशात गोडसेंचं उदात्तीकरण चालू देणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर दरवेळी नवा इतिहास लिहितात. शरद पवार यांना आपण कुठेही बेईमान म्हणालो नाही, असं स्पष्टीकरण देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.