खार पूर्व मुंबई मनपा कार्यालयातील अभियंत्यांना मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान 13 जणांची चौकशी केली असून चार जणांना अटक केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केल्याने मारहाण प्रकरण कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट येणार आहे.
कलम 353, 332, 506 आणि 34 भा.द.वी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम,शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली. सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर यातील काही जणांना सोडून देण्यात आलं आहे.
