पुण्यातील सदाशिव पेठेत लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन युवकांनी धाडस दाखवत एका मुलीचा जीव वाचवला होता. या प्रकरणी या मुलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोघांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. एका युवकानं कोयत्यानं एका मुलीवर हल्ला करुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोघांनी धाडस दाखवत मुलीचे प्राण वाचवले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचं कौतुक केलं आहे.
पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा संवाद घडवून आणला. जगदीश मुळीक यांच्या फोनवरुन फडणवीसांनी लेशपाल आणि हर्षद या दोघांशी फोनवरुन संवाद साधला. दोन्ही जिगरबाज तरुणांनी सजग नागरिक म्हणून दाखवलेलं धाडस प्रशंसनीय आहे, या शब्दांत फडणवीसांनी दोघांवरही कौतुकाची थाप टाकली.गृहमंत्री फडणवीसांनी स्वतःहून फोन करुन कौतुक केल्यानं लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्याशी बोलल्यानं खूपच छान वाटलं अशा शब्दांत लेशपालनं आनंद व्यक्त केला.
एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकाजवळ एका वीस वर्षीय तरुणीवर शंतनू जाधव याने कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळचे आणि हर्षद पाटील या दोघांनी वाचविले होते. गेल्या मंगळवारी ही घटना घडली होती. तरुणीला वाचविणा-या या दोघा युवकांचे विविध संस्था संघटना कडून कौतुक होत आहे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचं सर्वत्र कौतुक होते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांनी दोघांचं कौतुक केलं.
